मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ११ मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फोनवरून चर्चा करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्नाटकच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या आघाडी सामील होणार का आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची कमान हाती घेतल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती तिसऱ्या आघाडीची. भाजप विरोधी तिसरी आघाडी एकवटत असताना यामध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांची भूमिका काय असेल आणि कोणत्या मुद्द्यांवर हे पक्ष एकत्र येतील याची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढाकार घेत आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर हे सुद्धा यात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील का यासाठी या नेत्यांकडून प्रयत्न सुरू केल्या गेले आहेत यापूर्वी केसीआर आणि ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेतच.
11 तारखेला मुंबईत भेटउद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे यासाठी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती पवार यांनी दिली तर या संदर्भात कर्नाटकच्या निवडणुका नंतर होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यासाठी स्वतः नितीश कुमार येत्या 11 मे रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी नितीश कुमार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तिसऱ्या आघाडीत महाराष्ट्रातील या दोन पक्षांनी सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार जर पाहिलं तर भाजप विरोधातली आपली धार शरद पवार यांनी पुन्हा एकदा तीव्र केली आहे मधल्या काळात शरद पवार हे भाजपला पूरक भूमिका घेताना दिसले आहेत अशी टीका त्यांच्यावर केली गेली मात्र असे असले तरी भाजपला रोखायचे असेल तर नेमके काय करायला पाहिजे याचा वस्तू पाठच शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून दिला होता त्याचप्रमाणे विरोधकांनाही सोबत घेऊन भाजपला रोखता येऊ शकते हे पवारांनी दाखवून दिले असल्याने पवार आता पुन्हा एकदा त्याच भूमिकेत येतील आणि तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे होणार सहभागी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा नीतीश कुमार भेट घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेनेने घेतलेली ठाम भूमिका आणि तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी दर्शवलेली संमती पाहता उद्धव ठाकरे हे तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील आणि भाजपला कडाडून विरोध करतील अशी शक्यता आहे. मात्र शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांमुळे दुखावले गेलेले उद्धव ठाकरे तिसऱ्या आघाडीत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कशी भूमिका घेतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल, असेही भावसार म्हणाले.