मुंबई : राज्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी राज्यपालांच्या विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडला होता. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसातच हे सरकार कोसळले होते. तेव्हापासूनच या शपथविधी सोहळ्याच्या चर्चा सुरू होती. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच केला होता. मात्र, माझा दुसऱ्यांदा विश्वासघात झाला, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
फडवणीसांचा गौप्यस्फोट: 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या वादातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती फिसकटली. यातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र केवळ अडीच दिवस हे सरकार सत्तेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार पडले. मात्र, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवारांसोबत चर्चा:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर काही राजकीय समीकरणे फिरली आणि अजित पवार यांनी आपला पाठिंबा काढला. त्यामुळे यावेळी दुसऱ्यांदा आपला विश्वासघात झाला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली फसवणूक ही आपल्या जिव्हारी लागली होती, ती फसवणूक आपल्यासाठी मोठी होती, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा मोह : अजित पवार आता नेहमीच पहाटेच्या शपथविधी बाबत बोलणे टाळतात. पत्रकारांनाही त्यांना याबाबत प्रश्न विचारल्यास ते उत्तर देत नाहीत. फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या सोबत स्वच्छ मनाने सरकार स्थापन केले होते. त्यांनी फसवणुकीच्या भावनेतून शपथ घेतली नव्हती. मात्र, नंतर त्यांना तोंडघशी पडावे लागले, असे अजित पवार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा मोह होता. त्यामुळे त्यांनी युती तोडली. म्हणून आपण अजित पवार यांना सोबत घेऊन त्यावेळी सरकार स्थापन केले होते.
मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा नाही : 2019 च्या विधानसभा निवडणुका होण्याआधी कधीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर चर्चा केली नाही. अमित शहा यांची भेट झाल्यानंतर दोन दिवसाने केवळ पालघरच्या लोकसभा उमेदवारी बाबत चर्चा झाली होती. तो मतदार संघ आम्ही त्यांना दिला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाकडून बंडखोर उभे राहिले होते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेल्या 90% बंडखोरांना मागे घातले. पण शिवसेनेने त्यांचे बंडखोर उमेदवार मागे घातले नाही, असे वक्तव्य देखील फडणवीसांनी केले आहे.