मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी पक्षाकडून केली जात आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला अजित पवार यांनी समर्थन दिले आहे तर राष्ट्रवादीच्या इतर सर्व नेत्यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना पवारांच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी? :शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर ज्याप्रकारे अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती त्यात त्यांनी म्हटले होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या दमाच्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे. आपण शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिले पाहिजे. तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली होती. त्या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली? नवतरुणांना संधी देताना रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाणार का? रोहित पवार नव्या दमाचे आणि संयमी नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारी येणार का?, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रोहित पवारांचे योगदान : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात रोहित पवारांचा मोठा रोल होता. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर तीन मतदार संघातील जबाबदारी देखील सोपवली होती. राज्यातील नगरपंचायतच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वर पक्ष झाल्याने रोहित पवारांकडून पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
रोहित पवार गप्प का? : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रत्येक राजकीय भूमिका आणि निर्णयामध्ये त्यांच्या सोबत सावली सारखे खंबीरपणे उभे राहून मत मांडणारे रोहित पवार यावेळी मात्र गप्प का, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन की अजित पवारांच्या प्रतिक्रियेला समर्थन अशा द्विधा मनस्थितीत असल्यानेच रोहित पवार माध्यमांसमोर येत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता रोहित पवार यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे बोलले जात आहे.
हेही वाचा :Sharad Pawar Resigns : सुप्रिया सुळे की अजित पवार? आज राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमक काय झालं? वाचा सविस्तर