मुंबई Big relief to Rashmi Shukla : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असल्याने त्यांनी काही नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. त्यात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी त्यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने त्यांच्यावरील दोन्ही गुन्हे रद्द केलेत. यामुळे रश्मी शुक्लांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रश्मी शुक्ला यांना दिलासा -मविआ सरकार सत्तेत असताना फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आले होते. त्यातील एक गुन्हा पुण्यात नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी नोंदवण्यात आला. तर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा येथे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. त्यामुळे एकदा क्लोजर रिपोर्ट आला की दिलासा मिळतो अशी चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू होती. यातच आज उच्च न्यायालयात यावर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पुणे व मुंबई कुलाबा प्रकरणात गुन्हा रद्द करत रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला आहे. यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा फास आता संपल्यात जमा झालयं. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याबाबत सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर झाला होता. त्यामुळे सीबीआयने कोर्टाला केस बंद करण्याची विनंती केली होती. अखेर न्यायालयाने आज दोन्ही गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिल्याने रश्मी शुक्ला यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून एफआयआर दाखल करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.