मुंबई - बोरिवली पश्चिम येथे 8 हेक्टरच्या परिसरात कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. बोरिवलीतील गोराई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कांदळवन(खारफुटी) उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन आज अटल स्मृती उद्यान येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
बोरिवलीच्या गोराईत होणार अत्याधुनिक कांदळवन उद्यान; गडकरींनी केले भूमिपूजन
बोरिवलीतील गोराई येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कांदळवन उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन आज अटल स्मृती उद्यान येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. बोरिवली पश्चिम येथे 8 हेक्टरच्या परिसरात कांदळवन(खारफुटी) उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे.
या उद्यानात नेचर इंटरप्रीटेशन सेंटर म्युझियम, मॅग्रोव्ह ट्रेल, कायक ट्रेल आणि बर्ड ऑर्ब्झवेटरी टॉवरची सुविधा पर्यटकांसाठी उभारण्यात येणार आहे. उद्यानासाठी, आवश्यक असलेल्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई जिल्हा अधिकारी या सर्व संबंधित यंत्रणांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. कांदळवनांच्या संवर्धनासाठी आणि त्यांचे पर्यावरण साखळीतील महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे, अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला पर्यावरण प्रकल्प आहे
कांदळ म्हणजे नेमके काय ?
खाऱ्या जमिनीमध्ये येणाऱ्या झाडांना कांदळ किंवा खारफुटी म्हणतात. कांदळ ही सहसा समुद्र आणि खाडी या दोन्हींच्या मधल्या भागात जास्त उगवते. कांदळाची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात. ती गाळाला किंवा जमिनीला धरून ठेवतात. पूर, वादळ, त्सुनामी आल्यास पाण्याचा लोंढा या वनस्पतीच्या मुळाशी, झाडात, तसंच पानात अडतो. जेणेकरून पाण्याची वाढलेली पातळी शहराकडे तितक्या वेगाने पोहोचत नाही.