मुंबई: मुंबई पालिकेने ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामधील ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचे, टिळक नगर, नेहरु नगर, सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे आज रविवारी भूमिपूजन होणार आहे.
यांची उपस्थिती राहणार: मुंबईतील चेंबूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार पूनम महाजन, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, आदी लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.
रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण: मुंबई महानगरातील रस्ते कायमस्वरुपी खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करत आहे. त्यातील, एकूण ५२ किलोमीटर लांबीच्या १११ रस्ते कामांची सुरुवात केली जाणार आहे. यात पूर्व उपनगरातील ११.०६ किलोमीटर लांबीचे २४, पश्चिम उपनगरातील ३१ किलोमीटर लांबीचे ६१ रस्ते आणि शहर विभागातील ९.६६ किलोमीटर लांबीचे २६ इयोटी आहेत.