महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhiwandi Flyovers : बाराशे कोटीच्या तीन पूलांनी भिवंडी जोडली जाणार; वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका - भिवंडी वाहतूक कोंडीतून मुक्त होणार

ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या भिवंडी शहराला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आणि अन्य शहरांशी जोडण्यासाठी 'एमएमआरडीए'ने मोठा निर्णय घेतला आहे. भिवंडी शहराला तीन उड्डाणपूलांनी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे, अशी माहिती 'एमएमआरडीएनए'ने दिली आहे.

Bhiwandi Flyovers
उड्डाणपूल

By

Published : Feb 9, 2023, 4:19 PM IST

मुंबई:भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे असे शहर आहे. मुस्लिम बहुल लोकवस्ती असलेल्या भिवंडी शहरात आजही अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यात वस्त्रोद्योग, हातमाग आणि यंत्रमाग यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, भिवंडी शहरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून आता एमएमआरडी येथे भिवंडीला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी तीन मोठ्या उड्डाणपूलांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर या ठिकाणी हे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत.


सल्लागाराची नियुक्ती:भिवंडी शहराला जोडणाऱ्या या तीन उड्डाणपूलांचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती 'एमएमआरडीए'च्या वतीने केली जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


कुठे असणार उड्डाणपूल?भिवंडीतील कासारवडवली ते खारबावपर्यंत 800 मीटरचा खाडी पूल प्रस्तावित आहे. तसेच पहिला गायमुख ते भिवंडीतील चिंचोटी येथील पालेगावपर्यंत सुमारे एक किलोमीटर 800 मीटर लांबीचा खाडी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर हा सुमारे अर्धा किलोमीटरचा खाडी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. भिवंडी शहर अतिशय गजबजलेले असून हजारो वाहने मुंबई आणि घोडबंदर या महामार्गावरून नाशिक आणि गुजरातकडे ही जातात. हलकी वाहनेही या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भिवंडीला नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यावर मार्ग म्हणून भिवंडी शहराला आता थेट ठाण्याशी जोडले जाणार आहे. त्यासाठीच हा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात वेगाने काम :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात विकास कामांना आता वेग येताना दिसतो आहे. 'एमएमआरडीए'च्या वतीने आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प भिवंडीच्या तीन उड्डाणपणाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या या प्रस्तावित पुलामुळे भिवंडीकरांचे जगणे अधिक सुसह्य होणार आहे. भिवंडी शहरात असलेल्या लघु उद्योगाला आणि वस्त्रोद्योगाला यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याला अधिक चालना मिळेल असा दावा करण्यात येत आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी एमएमआरडीएच्या वतीने आता जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सल्लागार नेमणुकीनंतर या प्रकल्पाच्या पायाभरणीला लवकरच सुरुवात होणार आहे्. हे तीन पूल पूर्ण झाल्यानंतर भिवंडीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसायालाही चालना मिळेल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.

हेही वाचा :Chinese Spy Balloons targeted India: चीनची घुसखोरी.. भारताच्या हद्दीत 'स्पाय बलून' पाठवून गोळा केली सैन्याची गोपनीय माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details