मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिवसेना पक्षात बंडखोरी करत एकनाथ शिंदे भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर शिंदे गटामध्ये ठाकरे गटातील खासदार आमदार आणि नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटात देखील इन्कमिंग सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मातोश्रीवर बुधवारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरेंच्याहस्ते बांधले शिवबंधन: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे गटात मातोश्री येथे प्रवेश केला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते वाकचौरे यांना शिवबंधन बांधले.
शिवसैनिक पापाला माफी देत नाहीत : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भाऊसाहेब मला भेटले आणि म्हणाले चूक झाली. तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. माझी माफी मागितली नाही तरी चालेल परंतु माझ्या शिवसैनिकांची माफी मागा असे उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांना सांगितले. राजकारणामध्ये आपण या पक्षातून त्या पक्षात जाणारी पक्षांतरे पाहिली आहेत. पक्ष संपवणारे कटकारस्थाने करणारे पण पहिल्यांदा पाहात आहोत. तुम्ही सगळे शिवसैनिक दिलदार आहात. एखादा शिवसैनिक चुकला आणि पश्चाताप
व्यक्त केला तर त्याला माफ करतो. शिवसैनिक चुकीला की माफी देतो पण पापाला माफी देत नाही.
लवकरच शिर्डी येथे दौरा : पापींना राजकारणातून आपल्याला संपवायचे आहे. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार ठाकरे गटाचा असणारा असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सत्तेत बसणाऱ्यांना सबुरी अजिबात नसल्याने, मी एकटाच बाकीचे पक्ष संपवणार अशा प्रकारची मस्ती आपल्याला उतरवायची असल्याचे ठाकरे म्हणाले. लवकरच शिर्डी येथे दौरा करून सभा घेणार असल्याचेही ते म्हणाले.
चुक झाली - वाकचौरे : भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर 2009 साली त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. त्यानंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसचा हात पकडला. त्यानंतर ते भाजपासोबत गेले होते. मात्र पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्याने ठाकरे गटाची शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये ताकद वाढणार आहे. पक्षप्रवेशानंतर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, आपली चूक मान्य करत पक्षाला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शिवसेनेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना संपवायचे आहे. 'सुबह का भुला शाम को वापस लोटता है, तो उसे भुला नही करते' तो मी असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. मी चूक मान्य करून मी पुन्हा स्वगृही पोचलो असल्याचे वाकचौरे म्हणाले आहे.
हेही वाचा -
- Thackeray Faction : ठाकरे गटाला दिलासा; 'या' मोठ्या नेत्याची घरवापसी, पण...
- भाजपशी बंडखोरी करणाऱया भाऊसाहेब वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी, दानवेंनी केली कारवाई
- श्रीरामपूर विधानसभा: युतीकडून तिकीटासाठी रस्सीखेच, भाऊसाहेब कांबळेंच्या शिवसेना प्रवेशाने उत्सुकता