मुंबई - रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार करण्याची सुविधा नसतानाही रुग्णाला दाखल करणे भाटिया रुग्णालयाला महागात पडले आहे. या रुग्णालयातील तीन रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने रुग्णालय पालिकेने तात्पुरते बंद केले आहे. तर हिंदुजा रुग्णालयातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आयसीयू विभाग बंद करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीत ताडदेव येथे भाटिया रुग्णालयात आहे. या रुग्णालयात तीन रुग्ण इतर उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 70 कर्मचाऱ्यांची कोरोनाबाबत तपासणी केली जात आहे. तोपर्यंत तातपुरत्या स्वरूपात हे रुग्णालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.