मुंबई - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या ४ विभागातील उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबादेतून शिरीष बोराळकर, नागपूरमधून संदीप जोशी आणि औरंगाबादेतून नितीन धांडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशातील रिक्त ९ जागांसाठीही भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाल्याने ही पदवीधरची जागा रिक्त राहिली होती. नागपूरमधून भाजपाचे सदस्य अनिल सोले यांचीही 19 जुलैलाच मुदत संपली होती, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण तसेच शिक्षक मतदारसंघापैकी पुण्यातील अपक्ष सदस्य दत्तात्रय सावंत, अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे यांचीही मुदत यादरम्यान संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.