मुंबई :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा, घाटघर या निसर्गरम्य भागात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे गेल्या पाच दिवसांपासून वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन (Bhandardara Varsha Mahotsav) करण्यात आले होते. पहिल्या दोन दिवशी स्थानिक कलाकारांच्या आदिवासी नृत्यासह (tribal Bohada dance) बांबू पेंटिंग, आदिवासी वारली चित्रकला (Tribal Warli painting) या कार्यशाळेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, परराज्यातील उद्योगपती आणि पर्यटकांनी लावलेली हजेरी जमेची बाजू होती. यावेळी या पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. यासोबतच आदिवासी लोककलांनी मंत्रमुग्ध झालेले व्यावसायिक या भागात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पर्यटन सहसंचालक सुशील पवार यांनी दिली.
बोहाडा नृत्यावर थिरकले पर्यटक :पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईच्या ट्रेकचाही पर्यटकांनी आनंद लुटला. निसर्गरम्य धुक्याच्या पावसाळी वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकने पर्यटन महोत्सवात उपस्थितांचा आनंद द्विगुणित झाला. पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घाटघर, कोकणकडा येथे महिलांनी बोहाडा नावाचे आदिवासी नृत्य सादर केले. या नृत्याविष्काला पर्यटकांनी जोरदार प्रतिसाद दिला.