मुंबई - नागपूर खंडपीठाने शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयाच्या संलग्नतेबाबत निर्णय घ्या, असे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे सरकारने प्रलंबित मत्स्य विज्ञान विद्यापीठ मंजूर करावे, अशी मागणी डॉ. भालचंद्र मुनगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
रत्नागिरीचे मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शासन निर्णयानुसार आतापर्यंत कार्यरत राहिले आहे. त्यामुळे मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या पदव्या वैधच ठरायला हव्यात. मात्र, शासकीय तांत्रिक आणि शाब्दिक चुकीमुळे आज १३०० विद्यार्थ्यांच्या पदव्यांच्या वैधतेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका खटल्याचा निकष देताना नागपूर खंडपीठाने शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयाच्या संलग्नतेबाबत निर्णय घ्या, असे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे सरकारने प्रलंबित मत्स्य विज्ञान विद्यापीठाविषयी लवकरात लवकर उपाययोजना करावी, असे मुनगेकर म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या अक्षम्य बेफिकिरी आणि बेपर्वाहीमुळे कोकणच्या स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या निर्मितीचा प्रश्न गेली ११ वर्षे अधांतरीच राहिला आहे. कोकणला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. येथील हजारो कुटुंबांचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. २००२ च्या शासन निर्णयानुसार रत्नागिरी शिरगाव येथील हे मत्स्य विद्यालय दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले. मात्र, कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्य विज्ञान संबंधी अभ्यासक्रमाच्या विविध पदव्या देण्याचा अधिकार असल्याची तरतूद न केल्याने या महाविद्यालयातून गेल्या १८ वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी मत्स्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन पदव्या मिळविल्या आणि ते हजारो विद्यार्थी आज शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रात नोकरी व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पदव्यांच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रत्नागिरीचे मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत शासन निर्णयानुसार आतापर्यंत कार्यरत राहिले आहे. त्यामुळे मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या पदव्या वैधच ठरायला हव्यात. मात्र, शासकीय तांत्रिक आणि शाब्दिक चुकीमुळे १३०० पदव्यांच्या वैधतेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत मुनगेकरांनी व्यक्त केले. तसेच कोकणसाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयही तातडीने घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.