मुंबई -भारत देश अत्यंत विविधतेने नटलेला आहे. प्राचीन कालखंडापासून विविध भाषा आणि संस्कृती आणि चालीरीतीचा प्रवास आपल्याकडे अखंड सुरू आहे. महाराष्ट्रात देखील अनेक बोली बोलल्या जातात. कोकणातली बोली, वऱ्हाडातली बोली, पश्चिम महाराष्ट्रातली बोली, मराठवाड्यातली बोली, तशीच खानदेशातील 'अहिराणी' बोली ही देखील अशीच बोलीभाषा आहे. आता या अहिराणी बोली भाषेमध्ये श्रीमद् भगवद्गीता साकारली आहे. (Bhagavad Gita In Ahirani). त्याचे लेखक आहेत आनंद सूर्यवंशी. या अहिराणी भाषेतील पुस्तकाची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेली आहे. अनमोल ग्रंथासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे असा अभिप्राय देखील दिलेला आहे. (Bhagavad Gita translated in Ahirani language).
दोन ते अडीच कोटी लोकांवर खानदेशी भाषेचा प्रभाव - आज जस जसं विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विस्फोट आणि विकास होत आहे. तसतसे आपल बोलीभाषेपासून अंतर तुटत चाललेल आहे. त्याचे कारण नोकरी ,उद्योग, शिक्षण आणि विविध कारणांमुळे महानगराकडे सगळा लोंढा ओढला जातो. देशाची अर्थव्यवस्था नियोजनबद्ध नसल्यामुळे महानगरामध्ये उद्योग धंदे एकवटले. त्यामुळे महानगरात प्रचंड लोकसंख्या निवास करते. ती एक सूज म्हणून वावरते. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातून बोलीभाषा कळत नकळत मागे पडते. याबाबत भारतातल्या नामवंत लेखकांनी साहित्यिकांनी भाष्य केलेल आहे. अहिराणी ही अशी शेकडो काळातील महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक काही प्रमाणात नगरचा भाग काही प्रमाणात औरंगाबादचा भाग आणि तिकडे मध्य प्रदेशाचा खेतीयाचा भाग इथपर्यंत आणि गुजरात, छत्तीसगड इथपर्यंत या खानदेशी भाषेचा प्रभाव आहे. जवळजवळ दोन ते अडीच कोटी लोकांवर खानदेशी भाषेचा प्रभाव आहे.
दीपक केसरकर यांचा अभिप्राय अहिराणी भाषेला उर्जित अवस्था - याच अहिराणी भाषेच्या संदर्भात तिला विकसित करण्यासाठी व तिला टिकवण्यासाठी गेल्या 10-20 वर्षांमध्ये जो प्रयत्न होत आहे. त्या अहिराणी भाषेला उर्जित अवस्था आलेली दिसत आहे. खानदेश सांस्कृतिक महोत्सव यामधून देखील खानदेशातील अहिराणी भाषा टिकावी ती जोपासावी यासाठी त्या भाषेतून नियतकालिके देखील सुरू झालेले आहेत. आता भगवद्गीता हा ग्रंथ वैदिक परंपरेतील एक मुकुटमणिग्रंथ. या ग्रंथाबाबत भारतातील लहान थोर आणि जगातील अनेक लोकांनी या धर्मग्रंथाबाबत अनेक प्रकारे भाष्य केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका करीत 'भावार्थ दीपिका' नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो पुढे ज्ञानेश्वरी रूपाने आपल्या महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक झाला.
'अहिराणी बोलस गीता' -आता अहिराणी भाषेमध्ये अहिराणी जनतेला ज्यांना प्रमाण मराठी भाषा समजायला अडचण येते. ज्यांचं फारच शिक्षण झालं नाही किंवा झालंही असेल, अशा सर्वांसाठी आनंदराव सूर्यवंशी जे आधी शिक्षण अधिकारी होते, त्यांनी भगवद्गीता अहिराणीतून लिहिलेली आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'अहिराणी बोलस गीता' म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणू शकतो 'गीता अहिराणीत बोलते'. प्रकाशक ज्योती कपिले यांच्या जेके मीडिया याद्वारे ठाण्यातील प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या संदर्भात आनंदराव सूर्यवंशी यांनी ई टीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले, "मी मूळ अमळनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील राहणारा. मुंबईमध्ये शिक्षण अधिकारी या पदावर निवृत्त झालो. खानदेशातील अहिराणी माझी मातृभाषा. त्यामुळे साहजिकच त्या भाषेकडे माझा ओढा राहिलेला आहे. खानदेशातील काही शिक्षक काही अहिराणी भाषेतील व्यक्ती आणि मंडळ आणि खानदेश महोत्सव करणाऱ्या अनेक लोकांनी विनंती केली की, आपण अहिराणी भाषेत भगवद्गीतेवर अनुवादित पुस्तक लिहावं. त्यामुळे मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि हा अत्यंत सुंदर असा अनुभव आहे. मी माझ्या परीने अहिराणी भाषेत गीतेचा अनुवाद केलेला आहे आपण जिज्ञासू जनतेने ते वाचावं आणि त्यांनीच ठरवावे की हा अनुवाद कसा वाटला ते.
अहिराणी भाषेसाठी मोलाचे पुस्तक - यासंदर्भात प्रख्यात लेखक आणि साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आनंद व्यक्त केलेला आहे ते म्हणतात, "की भाषेचा विस्तार यामुळे अधिक होईल. अहिराणी भाषा शेकडो वर्षाची जुनी आणि विकसित होणारी प्रवाही ही अशी भाषा आहे. खानदेशातील अनेक संत आणि महात्मे होऊन गेलेले आहे. त्यामुळे अहिराणी भाषेचे मोठे योगदान मराठी भाषेला राहिलेल आहे. अहिराणी भाषेतील हे पुस्तक अत्यंत मोलाचे योगदान ठरणार आहे यात शंका नाही." अहिराणी भाषेला टिकवण्यासाठी खानदेश साहित्य संमेलन आयोजन करणारे खलील देशमुख यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की ,"असे सर्व विविध महत्त्वाच्या ग्रंथांवर अहिराणी भाषेतून पुस्तक तयार झाली पाहिजेत. जात्यावरच्या ओव्या असतील, संतांचे काव्य असतील, त्यांचे वचन असतील त्यावर नवीन लेखकांनी लिहिले पाहिजे. अहिराणी मधून श्रमिक जनतेचे जीवन लिहिलं पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला अहिराणी भाषा काय आहे ते नक्की समजेल.