मुंबई - नुकतेच बेस्टने तिकीट दर कमी केल्याने प्रवासी संख्येत वाढ झाले आहे. त्यामुळे बेस्टला अच्छे दिन येईल, असे वाटत असताना बेस्टवर पुन्हा संपाचे सावट आले आहे. २०१६ मध्ये वेतन करार संपुष्टात आल्यानंतर अद्याप नवीन वेतन करार न झाल्याने आणि वाटाघाटीही सुरू करण्यात न आल्याने बीईएसटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी येत्या ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.
६ ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारी संपावर; नवीन वेतन करार न झाल्यामुळे दिली संपाची हाक
२०१६ मध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन करार संपुष्टात आले. त्यानंतर अद्याप नवीन वेतन करार न झाल्याने आणि वाटाघाटीही सुरू करण्यात न आल्याने बीईएसटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी येत्या ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.
विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीला बेस्ट कामगारांच्या कृती समितीने पुकारलेला संप तब्बल ९ दिवस सुरू होता. त्यानंतर उच्च न्यायालयानेच या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ.आय. रिबेलो यांची महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मध्यस्थी म्हणून नेमणूक केली. यात बैठका अयशस्वी झाल्यामुळे मध्यस्थांनी त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर केला. त्यामुळे बेस्ट कामगारांच्या प्रश्नांबाबत अद्याप पूर्तता झाली नाही.
तर सुधारित वेतन व अन्य मागण्यांसंदर्भातील बैठक लोकसभा निवडणुकीच्या काळात लांबणीवर पडली होती. दरम्यान, निवडणूक संपल्यानंतरही वाटाघाटीसाठी कोणतेच प्रयत्न प्रशासनाने केले नाही. त्यामुळे बेस्ट कामगार संघटनांनी महापालिका प्रशासन आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांना संपाचा इशारा दिला आहे.