मुंबई - मुंबईकरांच्या प्रवासाची दुसरी लाईफलाईन बेस्ट आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने कंत्राटदाराकडून १ हजार भाडेतत्वार खासगी बसेस घेतल्या आहेत. त्यावर ड्रायव्हरही कंत्राटदारांचेच होते. आता बसवर कंडक्टरही कंत्राटदारांचेच नेमण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. बेस्ट उपक्रमाचा हा निर्णय खाजगीकरणाकडे वाटचाल करणारा असल्याने या निर्णयाला भाजपसह काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
बस, ड्रायव्हरनंतर कंडक्टरही कंत्राटी -
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बसेसचा ताफा वाढवण्यावर भर दिला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ३,३३७ बसेस असून ३ हजार भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. भाडेतत्त्वावरील ३ हजार बसेस पैकी १,१०० बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावत आहेत. भाडेतत्त्वावरील बसेस घेताना त्या बसवर ड्रायव्हर कंत्राटदाराचा असेल, अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली होती. मात्र, आता भाडेतत्त्वावरील बसेसवर ड्रायव्हर व कंडक्टरही कंत्राटदाराचा असेल अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली आहे.
हेही वाचा -मुंबईतही बदलाचे वारे; मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी भाई जगताप यांचे नाव आघाडीवर
भाजप, काँग्रेसचा विरोध -
प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी ४०० वातानुकूलित बसेस घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या बसेसवर ड्रायव्हर व कंडक्टर दोन्ही कंत्राटदाराचे असतील, असा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाचा भाजपसह काँग्रेसने विरोध केला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रमाला आर्थिक डबघाईत लोटत आहेत, असा आरोप भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे. बेस्ट उपक्रम खाजगी कंत्राटदाराच्या हाती देण्याचा डाव रचला जात आहे. महाव्यवस्थापकांना हा डाव उधळून लावू, असा इशारा मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवि राजा यांनी दिला आहे.
महाव्यवस्थापकांचे घुमजाव -
बेस्ट उपक्रमाचा सन २०२१ - २२ चा १८८७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावेळी ११०० बसेस खासगी भाडेतत्वावर घेतल्या आहेत. या बसवर चालक कंत्राटदारांचे आहेत. याला बसवर वाहक म्हणजेच कंडक्टर नसल्याने बेस्टचा खर्च कमी झाल्याचे सांगितले होते. आता खासगी बसवर चालकासह वाहकही कंत्राटी घेण्याचा प्रस्ताव सादर केल्याने महाव्यवस्थापकांनी दोनच दिवसात घुमजाव केले आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाबाबत विचारणा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.