मुंबई : मुंबईची जीवननवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाची शान म्हणू डबलडेकर बसची ओळख आहे. बेस्टच्या जुन्या बसचे आयुर्मान संपल्याने नव्याने इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस घेण्यात आली आहे. या बसला आरटीओकडून परवानगी मिळाली आहे त्यामुळे मंगळवार २१ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर ही बस धावणार आहे.
९०० इलेक्ट्रिक एसी बसेस घेण्याचा निर्णय :मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट या दोन उपक्रमाकडून नागरिकांना प्रवास करण्यासाठी वाहतूक सेवा पुरवली जाते. रेल्वेने ७० लाख तर बेस्टच्या बसने ४० लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या बसेस मुंबईमध्ये सर्व ठिकाणी जात असल्याने तसेच तिकिटाचे दर कमी असल्याने प्रवाशांकडून बेस्टच्या बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टने एसी, इलेकट्रीक बसला प्राधान्य दिले आहे. यामुळे बेस्टकडून पर्यावरण रक्षण केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने आपल्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसच्या ऐवजी नव्या ९०० इलेकट्रीक एसी बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली एसी बस :बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर बस येईल यासाठी गेले कित्तेक वर्षे तारखा देण्यात आल्या. मात्र बस काही ताफ्यात दाखल झाली नव्हती. बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या बसचे मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदघाटन केले होते. मात्र त्यानंतर बसच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये चूक असल्याने या बसला परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे बस नव्याने पुन्हा बनवण्यात आली. ११ फेब्रुवारी रोजी ही बस मुंबईमध्ये दाखल झाली. ही बस रस्त्यावर चालवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या बाकी असल्याने बेस्टच्या कुलाबा येथील आगारात उभी करण्यात आली होती.