माहिती देताना मंगल प्रभात लोढा मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बेस्ट बस वाहतूक सेवेच्या कंत्राटी चालकांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका मुंबईकर प्रवाशांना बसत आहे. कंत्राटी बस चालकांनी मुंबईकरांना वेठीस धरले आहे. मात्र असे असले तरी, नागरिकांना त्रास होणार नाही. प्रवाशांना वेळेवर इच्छित स्थळी पोहोचता येईल यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवा सुरळीत करणार : मुंबईमध्ये बेस्टच्या वतीने 3052 बसेस विविध मार्गांवर चालवल्या जातात. यापैकी बेस्ट प्रशासनाच्या 1381 बसेस चालत आहेत. तर १६७१ बसेस कंत्राटी तत्त्वावर भाड्याने घेतलेल्या आहेत. या सोळाशे एकाहत्तर बसेसच्या बस चालकांनी अचानक संप पुकारला आहे. बेस्टमध्ये या चालकांना सामावून घेण्यात यावे तसेच पगार वाढ मिळावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र यासंदर्भात बस चालकांच्या कंत्राटी कंपन्यांशी राज्य सरकार चर्चा करत आहे. या कामगारांच्या प्रश्नावर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल याबाबत दोन बैठका झाल्या. उद्या अंतिम बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत निश्चित तोडगा निघेल असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.
कठोर कारवाईचा विचार नाही :खासगी कंत्राटदार कंपन्यांवर राज्य सरकार कारवाई करणार का? यावर मंगल प्रभात लोढा म्हणाले की, या कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. या कंपन्या या खासगी बसेसचा देखभाल दुरुस्ती, खर्च तसेच त्यांच्या ड्रायव्हरचा पगार हे पहात असतात. या बसेसना किलोमीटर प्रमाणे भाडे दिले जाते. वास्तविक या कंत्राटदार खासगी कर्मचाऱ्यांचा बेस्ट प्रशासनाशी कोणताही थेट संबंध नाही. मात्र तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई न करता सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा विचार असल्याचे, लोढा यांनी सांगितले.
काय केल्या उपाययोजना : मुंबईकर प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी सध्या प्रशासनाने 180 गाड्या एसटी महामंडळाकडून तात्पुरत्या घेतल्या आहेत. तर 200 गाड्या एमएमआरडीएकडून घेतल्या आहेत. अशा प्रकारे सध्या विविध संस्थांकडून गाड्या घेऊन त्या चालवल्या जात आहेत. तर 2651 बसेस सध्या धावत आहेत. तरीही 400 बसेस कमी पडत आहेत. त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासन लक्ष देत आहे. दरम्यानच्या काळात हा संप मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. येत्या 24 तासात याबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन बेस्टसेवा पूर्ववत सुरळीत करण्यात येईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -
- Mumbai Best Bus: मुंबईत प्रथमच सत्र न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस्ट बस सेवा
- BEST Bus Strike Today : बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा सहाव्या दिवशीही संप सुरुच; चर्चेतून मार्ग काही निघेना