मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज मुंबईत सुरळीत सुरुवात झाली. मुंबईत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील ५९५ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ३५ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
12 वीच्या परिक्षेला सुरुवात राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ९१ हजार ३०२ विद्यार्थी बसले आहेत. काही वेळापूर्वी राज्यभरात या परीक्षेला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या बारावीच्या पहिल्या पेपरला अर्धा तास अगोदर मुलांना उपस्थित राहण्याच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वेळेत पोहोचल्याचे मुंबई विभागीय मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी मुंबई राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने ७० हून अधिक भरारी पथके तयार ठेवण्यात आली आहेत. तर त्यासोबतच विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या तब्बल १ हजार ८५५ विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटरपासून वेगवेगळ्या सुविधा त्यासोबतच लेखनिक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सोफिया महाविद्यालयातील निकशा नावाची विद्यार्थिनी ही महालक्ष्मी येथे असलेल्या लाला लजपतराय महाविद्यालयात आयपॅडवर परीक्षा देत आहे. तर विविध महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या, अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळेतून बारावीपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३०० हून अधिक आहे. हे विद्यार्थी मुंबईतील साठे, कीर्ती आदी महाविद्यालयात परीक्षा देत असल्याची माहिती महापालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी बोलताना दिली.