मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी, नववा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीस्थळाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम बाळासाहेबांच्या स्मृतीदिनापूर्वी पूर्ण केले जाईल, असे पालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. (balasaheb thackeray memorial beautification)
स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण व डागडुजी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण व डागडुजी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. उद्यान विभाग, विद्युत विभाग, मेंटेनन्स विभागातील एकूण ३५ कर्मचारी सुशोभीकरणाचे काम करत असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.