मुंबई -आपले शिवसेनेसोबतच सरकार बनवण्याचे ठरले आहे. जो अंतिम निर्णय होईल तो लवकरच कळवला जाईल. त्यासाठी सर्व आमदारांनी तयार राहावे, अशा सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिल्या आहेत. विधान भवन येथे शुक्रवारी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडी संदर्भात आमदारांची मुख्य बैठक झाली. या बैठकीत थोरात यांनी आपल्या आमदारांना राज्यात आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली.
राज्यपालांना देण्यात येणाऱ्या निवेदनासाठी आमदारांच्या सह्यांची गरज पडेल, ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्यांचे निवेदन तयार केले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका आमदारांनी दिली. या बैठकीत आम्ही आमदारांच्या सह्या या केवळ उपस्थिती मोजण्यासाठी घेतल्या असल्याचा दावा थोरातांनी माध्यमांशी बोलताना केला.