महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा? सर्व्हे रद्द करण्याची मागणी - BDD Chawl project mumbai

हा प्रकल्प राबवताना मूळ रहिवाशांचे पुनर्वसन करतानाच बीडीडी चाळीच्या मोकळ्या जागेत वसलेल्या पात्र झोपड्या आणि स्टॉलचेही नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठीच मंडळाकडून या तिन्ही ठिकाणच्या झोपड्या आणि स्टॉलचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, या सर्व्हेत मोठा घोटाळा झाल्याचा वाघमारे यांचा आरोप आहे.

बीडीडी
बीडीडी

By

Published : Oct 26, 2020, 5:54 PM IST

मुंबई- राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी बीडीडी चाळ प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप अखिल बीडीडी चाळी एकत्रित महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बीडीडीमधील झोपड्या आणि स्टॉलचे जे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात घोटाळा झाला आहे. अस्तिवात नसताना शेकडो स्टॉल्स आणि झोपड्यांना सर्वेक्षणात दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर, याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा त्यांचा दावा आहे.

माहिती देताना अखिल बीडीडी चाळी एकत्रित महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे

सर्वेक्षण त्वरित रद्द करण्याची मागणी वाघमारे यांनी मुंबई मंडळाकडे आज एका पत्राद्वारे केली आहे. ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी या तीन ठिकाणच्या बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. तर, हा प्रकल्प राबवताना मूळ रहिवाशांचे पुनर्वसन करतानाच बीडीडी चाळीच्या मोकळ्या जागेत वसलेल्या पात्र झोपड्या आणि स्टॉलचेही नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठीच मंडळाकडून या तिन्ही ठिकाणच्या झोपड्या आणि स्टॉलचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, या सर्व्हेत मोठा घोटाळा झाल्याचा वाघमारे यांचा आरोप आहे.

झोपड्या आणि स्टॉलचा आकडा कृत्रिमरित्या फुगवण्यात आला

सर्व्हे करताना या तिन्ही ठिकाणच्या झोपड्या आणि स्टॉलचा आकडा कृत्रिमरित्या फुगवण्यात आला आहे. अस्तित्वात नसताना म्हणजेच, बोगस झोपड्या-स्टॉल कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत. हा आकडा शेकडोंच्या घरात आहे. तर, लोकांकडून पैसे घेत त्यांच्या नावे अस्तित्वात नसलेली बांधकामे दाखवत या लोकांचीही फसवणूक करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. कशा प्रकारे मंडळाने सर्व्हेत बोगस झोपड्या-स्टॉल दाखवली आहेत, याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही वाघमारे यांनी केला.

सर्व्हे त्वरित रद्द करावा

हा भ्रष्टाचार कोट्यवधीच्या घरात असल्याचेही वाघमारे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे त्वरित रद्द करावा आणि नव्याने सर्व्हे करावा. तसेच, नव्या सर्व्हे वेळी कागदपत्रांची योग्य ती छाननी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली. तसेच, या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. तर, या तसे पत्र त्यांनी आज मुंबई मंडळाचे मुख्य अधिकाऱ्यांना दिले. आता मुख्य अधिकारी यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

हेही वाचा-अभिनेत्री पायल घोषचा राजकारणात प्रवेश.. हाती घेतला आरपीआयचा झेंडा

ABOUT THE AUTHOR

...view details