मुंबई - सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनर प्रकल्प चर्चेत आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या ठिकाणी रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. तेथील लोक आपली एक इंचही जमीन या प्रकल्पाला देणार नाही असे बारसू रिफायनरीला विरोध करणाऱया नागरिकांचे म्हणणे आहे. या नागरिकांच्या बाजूने काही राजकीय पक्षांनी आपली भूमिका घेतली आहे. तर सरकार मात्र हा प्रकल्प होणार या भूमिकेवर ठाम आहे. राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे आणि ठाकरे गट शिवसेना, मनसे तसेच इतर नेत्यांनी या प्रकल्पाबाबत आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. काही जणांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर काही जणांनी या प्रकल्पाची बाजू घेतली आहे. तर काही नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन प्रकल्पाचे काय करायचे ते ठरवावे असे मत मांडले आहे.
उद्धव ठाकरेंची भूमिका - या प्रकल्पाबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, बारसूबद्दल माझी जी भूमिका होती, तसेच नाणारबद्दल जी भूमिका होती, ती माझी नाही तर तिथल्या लोकंची भूमिका आहे. लोकांच्या भूमिकेनुसार पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प आपल्याला नको ही भूमिका घेऊन नाणारचा आणि येथील प्रकल्प नाकारत असल्याची भूमिका ठाकरे यांनी नुकतीच मांडली आहे. जर हा प्रकल्प लोकांच्या भल्यासाठी असेल, त्यांच्या हितासाठी असेल तर त्यांच्यावर दडपशाही करुन हा प्रकल्प का आणण्यात येत आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ही ग्रीन रिफायनरी असेल असे सांगितले जाते. तर मग मारझोड कशाला करताय असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेने बारसूच्या स्थानिक लोकांच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. तसेच या प्रकल्पाला विरोध केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर रिफायनरीचा विरोध करणाऱयांची अवस्था शिंदे फडणवीस सरकार जालियनवाला बागमध्ये झालेल्या हत्याकांडासारखी करेल असा आरोप केला आहे.
भास्कर जाधव यानी केले भाजपला लक्ष्य -उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यानीही यासंदर्भात भाजपला लक्ष्य करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जवळ-जवळ २ ते ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होईल असे सांगितले जात आहे. तर एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल. तसेच अप्रत्यक्षही शेकडो रोजगार निर्माण होतील असे सांगितले जात आहे. मात्र ही गोष्ट जाहीरपणे कोकणातील लोकांच्यासमोर जाऊन भाजपचे कुणी का सांगत नाही, असा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे. थेट लोकंशी भिडणे भाजप का टाळत आहे, असे सांगून शिवसेनेने यापूर्वी आणि आताही आपली भूमिका बदललेली नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना स्थानिक लोकांच्या बरोबरच असल्याचे ते म्हणाले. भाजप मात्र त्यांच्या पक्षवाढीसाठी हे उद्योग करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला तसेच त्यामध्ये त्यांना कदापी यश येणार नाही असेही जाधव म्हणाले. कोकणातील लोक समजूतदार आहेत. जर प्रकल्प आणायचा असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्याचे फायदे सांगून आणावा. दडपशाही करुन धाक दाखवून कुणीही कोकणात प्रकल्प उभारू शकत नाही असा दावा जाधव यांनी केला. त्याचवेळी ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांनी मात्र या प्रकल्पाला समर्थन देणारे ट्विट करुन खळबळ माजवली होती. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटण्यासाठी या प्रकल्पाला समर्थन असल्याचे ट्विट साळवी यांनी केले होते. 'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच.... माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये....' हे ते ट्विट होते.
मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका - कोणताही प्रकल्प लोकांवर अन्याय करून लादणार नाही. समृद्धी महामार्ग जो आपल्या सरकारने केला, त्यालाही पूर्वी विरोध झाला होता, पण नंतर लोकांनी परवानगी दिली आणि हा महामार्ग झाला. तसंच बारसूतले शेतकरी, भूमिपुत्र यांना विचारात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका - दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत आहेत. कारण बारसूला रिफायनरी व्हावी यासंदर्भातील पत्र उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला पाठवले होते. आता मात्र या प्रकल्पाला ते विरोध करत आहेत. त्याचवेळी या रिफायनरीमध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रदुषणाशिवाय ही रिफायनरी काम करणार आहे. ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. मात्र केवळ राजकारणासाठी या रिफायनरीला विरोध केला जात आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. उलट या रिफायनरीमुळे कोकणचे भविष्य बदलू शकते. या रिफायनरीमुळे १ लाख लोकांना थेट रोजगार मिळणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. बारसूच्या रिफायनरीमुळे आपण स्वयंपूर्ण होणार आहोत. एवढेच नाही तर आपण निर्यातदारही होणार आहोत अशी माहिती फडणवीस यांनी या प्रकल्पाबद्दल बोलताना दिली आहे. फक्त काही लोक या रिफायनरीचा विरोध करत आहेत. त्यामध्येही जर पाहिले तर त्यांचे नेते हे मुंबईतून जाऊन विरोध करत आहेत. मात्र आमची स्थानिक लोकांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांचे रास्त मुद्दे आम्ही चर्चा करुन सोडवू अशीही भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना बारसूमध्ये समाजविघातक गोष्टी घडवायच्या आहेत. आपण गृहमंत्री असल्याने यासंदर्भातील माहिती आपल्याकडे आहे. अशा समाजविघातक गोष्टी घडू नयेत यासाठी घटनास्थळी कलम १४४ लावण्यात आले. त्यामध्ये कोणताही दडपशाहीचा हेतू नव्हता असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांच्या मते येथील पर्यावरणावर विपरित परिणाम होईल. मासेमारीला मोठा फटका बसेल. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की असे काहीही होणार नाही. उलट ही रिफायनरी अत्याधुनिक असल्याने अगदीच नगण्य हानीकारक पदार्थ यातून बाहेर फेकले जातील. त्यांचेही योग्य व्यवस्थापन करण्यात येईल. त्यामुळे मासेमारीवर परिणाम होईल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे सांगितले जात आहे, ते खोटे आहे, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडले आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या स्थानिक लोकांना पुढे करुन उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तसेच लोकांच्यात नाहक संशय पसरवत असल्याचाही आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.