मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येत आहेत. अमित शहा यांच्या स्वागतासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईभर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर अमित शहा यांचा हा चौथा महाराष्ट्र दौरा असून मुंबईत ते दुसऱ्यांदा येत आहेत. अमित शहा यांचे मोठमोठे होर्डिंग मुंबईभर लावण्यात आले असून त्या होर्डिंग्जवर अमित शहा यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते आनंद दिघे व त्याचबरोबर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत.
बाळासाहेबांचा फोटो वापरू नका?शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर, हिम्मत असेल तर बाळासाहेबांचे फोटो बॅनर वर वापरू नका, अशी ताकीद स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिली होती. परंतु बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याकारणाने तो आमचा अधिकार असून त्यांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत, अशा पद्धतीचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्या कारणाने आजही बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने भाजप - शिंदे गट सर्व ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करताना दिसत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर लावलेले मोठ मोठे होर्डिंग्ज म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.