मुंबईMumbai Crime News: 29 वर्षीय प्रॉडक्शन डिझायनरला ब्लॅकमेल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ झाकीर खान असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे पोलिसांच्या ताब्यात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमागे ब्लॅकमेलच्या माध्यमातून खंडणी उकळणारी टोळी असल्याचं वांद्रे पोलिसांनी सांगितलं. या टोळीतील इतर साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
व्हिडीओ शेअर करण्याची दिली धमकी :अधिक माहिती देताना वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) सांगितलं की, तक्रारदार त्याच्या आईसोबत वांद्रे येथे राहतो आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम करतो. 20 सप्टेंबरला तो सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहत होता. यावेळी त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनुष्का शर्मा नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही विनंती स्वीकारल्यानंतर त्यांनी चॅटिंग सुरू केले. दरम्यान, दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले होते. व्हाट्स ऍपवर चॅट दरम्यान तिने त्याला व्हिडिओ कॉल केला होता. हा कॉल आल्यानंतर त्याला समोर एक विवस्त्र महिला दिसली. त्यावेळी तक्रारदार खूप घाबरला आणि त्याने कॉल बंद केला. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीने त्याला एक मॉर्फ केलेला व्हिडिओ पाठवला. ज्यामध्ये तक्रारदार देखील नग्न अवस्थेत दिसत होता. हा व्हिडीओ मित्रांना सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली.