मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत तीव्र धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकरी नेते बीकेसीतील अंबानींच्या कार्यालयावर धडकणार आहेत. दुपारी 12 वाजता शेतकरी वांद्रे उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमणार आहेत. येथून पुढे ते बीकेसीच्या दिशेने कूच करणार आहेत. त्यानुसार सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येथे जमू लागला आहे. तर, दुसरीकडे या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच रोखण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकरी नेते बीकेसीतील अंबानींच्या कार्यालयावर धडकणार 500 पोलीस तैनात वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यानुसार, या परिसरात काल रात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंदाजे 500 पोलीस येथे तैनात करण्यात आले आहेत. तर, पोलिसांच्या इतर तुकड्याही तैनात आहेत. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून बीकेसीच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा -अंबानी यांच्या कार्पोरेट हाऊसवर धडकणार शेतकरी
हे नेते थोड्या वेळात होणार दाखल
वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 12 वाजता राज्यातील महत्त्वाचे शेतकरी नेते येणार आहेत. यात राजू शेट्टी, जयंत पाटील, बच्चू कडू आदी नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, सकाळपासूनच येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दाखल होत आहे. 12 वाजता त्यांची संख्या प्रचंड वाढेल आणि मग मोर्चाला सुरुवात हॊईल.
बीकेसीवर धडकणारच - शेतकरी
कोल्हापूर, चाळीसगाव, अमरावती, नाशिक अशा ठिकाणाहून शेतकरी दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांना वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवले जाण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्याशी 'ईटीव्ही भारत' ने सवांद साधला असता आम्ही कोणत्याही परिस्थितीत बीकेसीवर धडकणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूरचे अध्यक्ष वैभव यांनी नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्याचे सांगत हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आमचे शेतकरी बांधव थंडीत दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज येथे जमलो आहोत. आज आम्हाला अडवले तरी आम्ही बीकेसीला जाऊच, असा निर्धार कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -शिक्षणमंत्री बच्चू कडू यांना मुंबईला जाण्यापासून रोखले; वरिष्ठांच्या आदेशावरुन कारवाई?