मुंबई :राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर पडल्यानंतर पालिकेनं पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील रस्त्यांवर क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे. बृन्मुंबई महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रस्ते, चौक, महत्त्वाच्या ठिकाणी 720 क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी 30 ते 35 क्लीन-अप मार्शल नियुक्त करण्याची पालिकेची योजना आहे. क्लीनअप मार्शलनं ठोठावलेल्या दंडाच्या 50 टक्के रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे, तर 50 टक्के रक्कम पालिकेला मिळणार आहे.
सध्या पोलीस पडताळणी सुरू :मुंबईतील रस्त्यांवर तैनात करण्यात येणाऱ्या क्लीनअप मार्शलना त्यांची संपूर्ण ओळख, मोबाइल क्रमांक आणि नेमप्लेट असणारे ड्रेस दिले जातील, असं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे. क्लीनअप मार्शलसोबत गैरवर्तन झाल्यास क्लीनअप मार्शलच्या ड्रेसच्या मागील बाजूस एक नंबरही दिला जाईल. सध्या या क्लीनअप मार्शलची केवळ पोलीस पडताळणी बाकी आहे. पालिकेनं क्लीनअप मार्शल नियुक्त करण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह पोलीस पडताळणी अनिवार्य केल्यानं सध्या तपासणी सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर आयुक्त रस्त्यावर मार्शल तैनात करण्यास परवानगी देतील.