मुंबई - राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएमवरच होणार आहेत. त्यासाठी आम्ही यात अनेक प्रकारचे बदल करणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच आता बॅलेट पेपर हे इतिहासजमा होणार असेही त्यांनी सांगितले. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा -चक्क... वाहतूक मंत्र्यांच्याच गाडीची बनवली बनावट पीयुसी
राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही २८ लाख आहे. त्यात आता वाढ करण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यात वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. येथून पुढे ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान होणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य आहे. काही यंत्रात बिघाड होऊ शकतो. मात्र, ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नाही, असे अरोरा म्हणाले.
हेही वाचा -..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे
तसेच सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यात सुरू असेलल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही प्रश्न येणार नाही, यासाठी अत्यावश्यक सेवांची यात तरतदू केली जाईल, असेही अरोरा म्हणाले. काँग्रेसकडून राज्यात असलेल्या बोगस मतदारांच्या संदर्भात तक्रार आली आहे. त्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती आम्ही देणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात महत्वाच्या आणि संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावली जाणार आहेत. तर राज्यातील पोलीस आणि इतर बलासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस आदी बल या निवडणुकीत तैनात केले जाणार आहे.
हेही वाचा -विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिल्लीतून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बुधवारी सविस्तर चर्चा केली.
हेही वाचा -'उपऱ्यां'मुळेच भूमिपुत्रांच्या घरात संपत्ती - आ. जितेंद्र आव्हाड