मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. उद्याचा देशभरातील बंद हा अभूतपूर्व असणार आहे. राज्यभरातील भाजीपाला, बाजार समित्या, पंचायत समित्या बंद राहणार आहेत. या बंदला काँग्रेसचा केवळ पाठिंबा नाही. तर मोठा सहभाग असणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. या बंदला जनतेने आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भारत बंदवर प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद हा भाजप विरोधात शेतकरी असा आहे. शेतकरी- कामगार धोरणांच्या विरोधात देशातील शेतकरी आणि कामगार एकवटले आहेत. मूठभर भांडवलदार आणि श्रीमंतांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी हा बंद आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आम्ही सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही राज्यभरात अनेक आंदोलने केली. तसेच ट्रॅक्टर रॅली काढली. विविध तहसीलदारांना निवेदने दिली, असे थोरात यांनी सांगितले.
बाजार समित्या उद्या बंद -
भारत बंदमध्ये काँग्रेसचा केवळ पाठिंबा नाही. तर काँग्रेस मोठ्या प्रमाणात सहभागी असणार आहे. भाजपाने कृषी कायद्याच्या माध्यमातून बाजार समितीवर घाला घातला असल्याने महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्या उद्या बंद असतील आणि उद्याचा बंद हा अभूतपूर्व असेल. यामुळे या बंदमध्ये सर्वसामान्य जनतेने आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कृषी विधेयकावर तोडगा नाही -
राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पास केलेले तीन कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. येथील सर्व शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था एक मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून आता चपाती तयार करण्याची यंत्रे आंदोलन स्थळी आणण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिघळण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात 8 डिसेंबरला भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे.