मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात महाविकास आघाडीने जागा वाटपाबाबत आढावा घेतला आहे. आम्ही राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा सध्या आढावा घेतला आहे. मात्र यापुढील काळात मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. त्यावेळी ज्या पक्षाच्या अथवा ज्या पक्षाच्या उमेदवाराचा ज्या मतदारसंघात प्रभाव असेल त्यांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. आघाडीमध्ये आम्ही सर्व एकमताने निर्णय घेत असून जागा वाटपाबाबत आमचे धोरण लवचिक आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे जागा वाटपाबाबत कशा पद्धतीने आघाडीतील घटक पक्षांना अथवा मित्र पक्षांना प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप आणि मित्रपक्षाला राज्यात भवितव्य नाही: राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता राज्यात भारतीय जनता पक्षाला अथवा त्यांच्या मित्र पक्षाला कुठलेही भवितव्य दिसत नाही. राज्यातील जनतेचा आघाडीच्या बाबतीत खूप चांगला प्रतिसाद आहे. आघाडीला जनता प्रचंड अनुकूल असल्याचे वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर देशातील वातावरण सुद्धा बदलले असून आता वारे बदलले आहेत. कर्नाटक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने विजय मिळवला त्याच पद्धतीने आगामी छत्तीसगड, राजस्थान तसेच मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला निश्चितच यश संपादन करता येईल, असा दावाही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला.
काँग्रेस अध्यक्षपदाबाबत प्रसार माध्यमेही उत्सुक : कोणत्याही पक्षांच्या अध्यक्षपदाच्या जेव्हा निवडणुका होतात. तेव्हा त्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी दिली जात नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतच्या कोणत्याही निवडणुकी संदर्भात दिली जाते, असे आपले निरीक्षण असल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यामुळे सध्या जरी आपले नेते दिल्लीमध्ये गेले असले तरी ते अध्यक्षपदाच्या बदलासाठी गेले आहेत असे म्हणता येणार नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.