मुंबई- राज्यात राज ठाकरे यांची ज्याप्रकारे ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यात ज्याप्रकारे दबाबाचे राजकारण सुरू आहे, त्याचप्रकारचा दबाव हा राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशासाठीही असू शकतो, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केली.
बँकेसाठीचा आदेशही सरकारच्या दबावाचा भाग असू शकतो राज्यात आणि देशात सरकारचे दबावाचे राजकारण सुरू आहे. जे भाजपमध्ये गेले, त्यांच्या चौकशा थांबतात, ते शुद्ध असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे जे सरकारच्या विरोधात बोलतात, ते एक तर देशद्रोही ठरतात नाहीतर त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जाते. आमचे आणि राज ठाकरे यांच्याशी काही मत-मतांतरे जरी असले तरी, ते त्या विषयासाठी समर्थ असून ते त्याला समर्थपणे तोंड देतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी टिळक भवन येथे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यापूर्वी थोरात यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले. ते म्हणाले की, राज्य सरकारी बँकेने आदेश दिलेले आहे, त्यातही दबावाचा भाग असू शकतो. राज्य सहकारी बँकेत त्यावेळी जे काही निर्णय घेतलेले असतील, त्या परिस्थितीमध्ये साखर कारखाने, सहकारी संस्थांना अडचणी सोडविण्यासाठी हे निर्णय घेतलेले असतील आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न असणार असे माझे मत आहे. मला त्यातले बारकावे माहीत नाही, मात्र जे प्रयत्न केले असतील त्यात थोडी अनियमितता झाली असतील, यापेक्षा त्यात वेगळे असे काही वाटत नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही दिल्लीत सर्व नेते उपस्थित होते. त्यावेळी आम्ही राज्यातील विधानसभा निवडणुका आणि त्यासाठीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यासाठीची चर्चा आम्ही केली. त्या चर्चेनुसार या आठवड्यात पुन्हा मंगळवारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसून ज्या जागांचा विषय शिल्लक राहिलेला आहे, त्या जागांविषयी चर्चा करणार आहोत. मधल्या काळात सांगली, कोल्हापूर या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने जागा वाटपाचा विषय आम्ही मागे ठेवला हेाता. त्यामुळे आता तो लवकरच पूर्ण केला जाणार असून त्यानंतर आमचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांच्यासोबत आम्ही नंतर चर्चा करणार असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.