मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मराठवाड्यातील एकही योजना आमच्या सरकारने बंद केली नाही. उलट प्रत्येक योजना आणि विकास कामांचा सरकारकडून आढावा घेतला जात आहे. अशात मागील ५ वर्षात विकास कामांऐवजी केवळ भाषणबाजी करणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना सध्या कोणतेही काम नाही, अशी जोरदार टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात मराठवाड्यातील योजना सरकारकडून बंद करण्याचा आल्याचा दावा केला होता. त्या विधानावर थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंकजा मुंडे यांनी गेल्या ५ वर्षात भाषणं केली, काम नाही, फक्त जाहिराती चांगल्या होत्या, अशी टीकाही थोरात यांनी केली. आता आमचे सरकार आणि आम्ही काम करू आणि मराठवाड्यातील जनतेला न्याय देवू असा विश्वासही आज त्यांनी मुंबईत व्यक्त केला.
राज्यात आता थेट संरपच निवडीसंदर्भात विचारले असता, आम्ही थेट सरपंच निवडीबाबत काही अभ्यास केला आहे. त्यावर निर्णय घेतला. सरपंच निवडून आले पण बहुमत नाही. त्यामुळे काम होत नाही अशा तक्रारी आहेत. हा अनुभव आल्यानंतर हा निर्णय घेतला जातोय, असेही ते म्हणाले.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेवर सुरू असलेल्या चर्चेच्या संदर्भात थोरात म्हणाले, राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत जे काम केले ते उल्लेखनीय होते. आजही ते त्यांचा भूमिकेवर ठाम राहतील, अशी अपेक्षा आहे. राज ठाकरे आपल्या विचारांशी तडजोड करतील असे वाटत नाही असेही थोरात म्हणाले.
हेही वाचा - राम मंदिराची दारे उघडा.. मुंबईत माजी आमदाराचे आमरण उपोषण सुरू
राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन करताना आम्ही शिवसेनेकडून घटनाबाह्य काम करणार नाही, असे लिहून घेतले आहे. त्यामुळे सेनेकडून असे काम होत असेल तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असा इशारा काल काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. त्यावर थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, विधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. आम्ही ठरवलेला कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि संविधानाची बांधिलकी आहे, तसेच आम्ही तीनही पक्ष मिळून काम करू. केंद्रातील सरकारकडून देशात संविधानाला धक्का लावण्याचा काम सुरू आहे. अशा स्थितीत अशोक चव्हाण यांनी नेमके काय विधान केले माहीत नाही. मात्र, आम्ही ५ वर्ष एकत्रित काम करणार आणि हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार असल्याचा विश्वासही थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धोका, 4 संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल