मुंबई- राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे 16 नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, भयंकर दुष्काळातून कसेबसे सावरत असताना राज्यावर पूराचे संकट ओढावले आहे. मुंबई, कोकणासह, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीला पूर आल्याने नाशिक शहरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोल्हापूर शहराला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. गावे पाण्यात बुडाली आहेत. गृहोपयोगी सामान वाहून गेले आहे. पुरामुळे पिकांची मोठी नासाडी झाली असून पशुधन संकटात सापडले आहे. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे उद्धवस्त झाले असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यात्रा काढून मतांचा जोगवा मागण्यात व्यस्त आहेत.