मुंबई -चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग आणि वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली आहे. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असतानाही अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला आहे, असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते संगमनेर येथे माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, चीनप्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र, त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. १९६२ आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे. ४५ वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान हुतात्मा झाला नव्हता. गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही, असे म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या जवानांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच शरद पवारसाहेबांनाही असेलच, असेही थोरात म्हणाले.
राहुल गांधीजी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. त्यांची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल? भाजपने काँग्रेसच्या सुचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये. प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे. त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच असल्याचे थोरात म्हणाले. शरद पवार काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुलजींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये. मला खात्री आहे, पवारसाहेबही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील असेही थोरात म्हणाले.