मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन २ दिवस झाले. मात्र, अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही. खाते वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना या तिन्ही पक्षामध्ये काही खात्यावरून मतभेद असल्याचे कारण समोर येत आहे. मात्र, लवकरच खातेवाटपावर चर्चा करून मंत्र्यांना खाते वाटप करण्यात येईल. शक्यतो आजच खाते वाटपासंदर्भात चर्चा करून ते जाहीर करण्यात येईल,असे मत महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
खाते वाटपापर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, लवकरच खाते वाटप करण्यात येईल, आधी मंत्रिमंडळ विस्तार होतो. त्यानंतर खाते वाटप होत असते. खाते वाटपाची प्रक्रियाही अशा प्रकारे २ दिवस चालतच असते. तसेच तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एकत्र बसून चर्चा करावी लागते. काँग्रेसमुळे खातेवाटपाला उशीर झाला नाही.