मुंबई - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे काँग्रेस पक्षही लोकांच्या मदतीसाठी सक्रीय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांना सर्व पातळ्यांवर लोकांना मदत करण्यासाठी पत्र पाठवून आवाहन केले. यानंतर आता त्यांनी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला.
गरिब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. थोरात म्हणाले, अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची काँग्रेसची परंपरा आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला मदत करण्यास काँग्रेस सेवादलातर्फे ५० प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १० हजार बाटल्या रक्त जमा करण्यात येत आहे. तसेच युवक काँग्रेसमार्फत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे गरजूंपर्यंत पोहोचवली पाहिजेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत हे काम करावे. ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांच्या घरात अन्नधान्य शिल्लक नाही, ज्यांना जेवणाची भ्रांत आहे, अशा लोकांची संख्या मोठी आहे. आपल्या भागातील अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण किंवा अन्नधान्य पोहोचविले पाहिजे. एकही नागरिक उपाशी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.