मुंबई -विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणून त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जात असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते. सरकार त्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी त्यांनाही ईडीची नोटीस बजावली असल्याचे थोरात म्हणाले.
राज्यात आणि देशांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी सरकारकडून दबावतंत्र सुरू असल्याचे थोरात म्हणाले. दबावतंत्राचा एक भाग म्हणून विरोधकांना नोटीस बजावल्या जातात. तर कधी सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात असल्याचा आरोप थोरातांनी केला.