महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची जागा बदलली, जयंती दिनी उद्घाटन अशक्य - बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबई महापालिकेतील तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती.

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे

By

Published : Dec 13, 2019, 5:04 AM IST

मुंबई- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार आहे. मात्र, या पुतळ्याच्या जागेत बदल केल्याने पुन्हा नव्याने परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे उदघाटन होणार नसल्याची माहिती आहे. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या जागा बदलाबाबतचा प्रस्ताव गुरुवारी पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची जागा बदलली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबई महापालिकेतील तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने पाठपुरावा केल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजूरी दिली. मात्र, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी होकार आलेला नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा - 'व्हर्जिन'चे रिचर्ड ब्रॅन्सन उद्धव ठाकरेंच्या भेटीला, 'हायपरलूप'बाबत चर्चा

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्याने पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाची परवानगी मिळणार होती. त्यामुळे येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे उदघाटन होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, आता हा पुतळा महात्मा गांधी रोड, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बसवण्याची मागणी शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे. रिगल थिएटर जवळील जागा छोटी असल्याने मोठ्या जागेत हा पुतळा उभारला जावा. म्हणून जागेत बदल करण्यात आला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे पुतळ्याची जागा बदलल्याने पुन्हा नव्याने परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. यामुळे बाळासाहेबांच्या जयंती दिनी या पुतळ्याचे उदघाटन होणे अशक्य झाले आहे.

कुठे आणि कसा असेल पुतळा -

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. आता या जागेच्या बाजूला म्हणजेच महात्मा गांधी रोड, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी बाळासाहेबांचा 9 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप) सह 11 फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहपरिवार शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details