मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचे अनावरण सोहळ्यासाठी आज विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी, अनेक कलाकार तसेच विविध देशांचे वाणिज्य दूध देखील या प्रसंगी हजर राहिले. दरम्यान, सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेता अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे तसेच विधान परिषदेचे उपसभापती नीलम ताई गोरे अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेबांच्या हाती रिमोट कंट्रोल : या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे रिमोट कंट्रोल चालवत होते. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जनतेच्या हितासाठी ते रिमोट कंट्रोल चालवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा मराठी अस्मितेचे रक्षण बाळासाहेबांनी शिवसेनेकांची अवेध्य अशी ही कार्यकर्त्यांची फळी उभारली. छत्रपती शिवरायांना बाळासाहेब दैवत मानत व दैवत समान देवाची पूजा जर आम्ही करत असू तर सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. मी आज राजकारणावर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली.
हिंदुत्ववादी असामान्य नेतृत्व : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हे सत्तेसाठी कधीच नव्हते. एका प्रकरणामुळे हक्क भंग नोटीस दिल्यामुळे बाळासाहेबांना या विधानभवनामध्ये यावे लागले होते. मात्र त्यांनी सत्तेच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेशी जाती-धर्मात्या लोकांची आपली नाळ जोडली आणि ते प्रकार हिंदुत्ववादी असे एक असामान्य नेतृत्व होते, अशा विशेषणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील आठवणींना उपमुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
बाळासाहेब सर्वसामान्यांचे नेते : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांना सर्व जाती धर्मातले लोक मानत होते. जो भारत विरोधी आणि पाकिस्तानची बाजू घेणार होता अशांना बाळासाहेब विरोध करीत होते. मात्र, जाती धर्माच्या पलीकडे जात बाळासाहेब सर्वसामान्यांचे नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वागणे आणि बोलणे अत्यंत परखड आणि पारदर्शी होते. ओठांमध्ये एक आणि पोटात एक असे बिलकुल नव्हते त्यामुळे बाळासाहेबांची ही ओळख असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
बाळासाहेब खरे लोकशाहीवादी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत असताना बाळासाहेब अखंड महाराष्ट्रवादी होते आणि त्यांना कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. यापेक्षा लोकशाहीवादी कोण असू शकते तसेच बाळासाहेब कोणताही धर्म अथवा जातीवरून कोणाला न्याय देत नव्हते, त्यामुळे त्यांच्या इतका धर्मनिरपेक्ष देखील कोणी पाहिला नाही, अशा शब्दात नार्वेकरांनी बाळासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले.