मुंबई Balasaheb Thackeray Death Anniversary : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर दादरच्या शिवतीर्थावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन मोठा वाद झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे शिवतीर्थावर प्रचंड तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवतीर्थावर शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात : सध्या दादरच्या शिवतीर्थावर शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत आहेत. मात्र, संभाव्य तणावाची परिस्थिती लक्षात घेता परिमंडळ पाचचे उपायुक्त मनोज पाटील यांनी "कोणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या या भागात बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अकरा वाजेपर्यंत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.