Balasaheb Thackeray Death Anniversary :शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 11 वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. तसंच अनेक राजकीय नेत्यांनी एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट :आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी माजी पर्यावरण मंत्री आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणालेत की, आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात 'स्पेशल' असतं. त्यात आदर असतोच, पण मैत्री जास्त असते. धाक असतोच, पण प्रेम जास्त असतं. वयाचं अंतर असतंच, पण मन जवळ असतं. आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो. त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही! मी भाग्यवान आहे की, जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे. बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, या शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले :साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दादर येथील स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
शरद पवार यांनी केले स्मरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण केले. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, राजकीय भाष्यकार, अमोघ वक्ता यासारख्या विविध क्षेत्रात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. जनमानसांमध्ये मराठी अस्मिता जागवणारे, मराठी माणसांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणारे, तत्वांचे मोल जाणणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
- संजय राऊतांची पोस्ट : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. पोस्टमध्ये ते म्हणालेत की, साहेब...सदैव तेवत राहील ही ज्योत तुमच्या आठवणीत, तुमच्या अस्तित्वाची साक्ष देत.
- साहेबांवर माझं प्रेम आणि निष्ठा होती :साहेब या जगातून निघून गेल्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुध्दा विश्वास बसत नाही. साहेबांवर माझं प्रेम आणि निष्ठा होती. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्य होते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.