जळगाव -वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. इंधनासह दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने त्या गोरगरिबांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. मात्र, तरीही केंद्र व राज्य सरकार वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही, असा आरोप करत महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी दुपारी जळगावात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून वाढत्या महागाईचा निषेध केला.
आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून केली घोषणाबाजी -
शहरातील स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढत्या महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मोर्चात बैलगाडी, दुचाकी तसेच रिक्षा आणल्या होत्या. विशेष म्हणजे, महागाईचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर किती परिणाम झाला आहे, इंधनाचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने वाहने ढकलण्याची वेळ आली आहे, हे दर्शवण्यासाठी आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून, घोषणाबाजी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.