धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन दरबाराचा पहिला दिवस मीरा भाईंदर (ठाणे) : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दर्शन दरबार ठाण्यातील मीरा भाईंदर येथे आयोजित करण्यात आला आहे. मीरा भाईंदर येथे दोन दिवस हा दरबार आयोजित करण्यात आला आहे. दरबार सुरू होण्यापूर्वीच धीरेंद्र शास्त्री महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतर त्यांच्या दिव्य दर्शन दरबारचा पहिला दिवस पार पडला.
महिलेचे मोठे वक्तव्य :धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या दिव्य दर्शन दरबारात एका महिलेचे मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले की, धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या दरबारात माझे मंगळसूत्र चोरी झाले आहे. मंगळसूत्र चोरी झाल्यानंतर मला वाटले होते की बाबा काहीतरी करतील पण बाबांनी काहीच केले नाही. माझा आता त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.
दरबारात चोरांचा सुळसुळाट : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन दरबारात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. दरबारात तब्बल वीस ते पंचवीस महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महिलांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उच्च न्यायालयाची परवानगी : बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराज आज मुंबईत दाखल झाले. तत्पूर्वी धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रम होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिवक्ता नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानागी दिली. पोलिसांनी कायद्याचे गांभीर्याने पालन करावे, असे आदेश देखील यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दिव्य दर्शन दरबाराचा पहिला दिवस आयोजकांना पोलिसांची नोटिस : मिरा रोड पोलिस स्टेशनतर्फे आयोजकांना कार्यक्रम सुरू होण्यापर्वीच नोटिस बजावण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ शकते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आयोजकांना पोलिसांनी नोटिस दिली आहे. नोटिसमध्ये बजावलेला प्रतिबंधात्मक आदेश 9 मार्च ते 23 मार्च या कालावधीत लागू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नोटिसच्या सूचनेनुसार सार्वजनिक घोषणा, गाणे, वाद्य वाजवणे, भाषणे करणे, ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : Bombay HC on Dhirendra Shastri Event : धीरेंद्र शास्त्रींना मोठा दिलासा; कार्यक्रमाला न्यायालयाची परवानगी