मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून मानहानीकारक वक्तव्य केल्यामुळे सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. याच मुद्द्यावरून काल लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात येते.
पुण्यात बॅनर झळकावले:काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आली होती. परंतु त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत राहुल गांधी यांना एक न्याय व बच्चू कडू यांना एक न्याय अशा आशयाचे पुण्यात बॅनर झळकावले आहेत. यावरून बच्चू कडू यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.
बॅनर लावलेले कार्यकर्ते अति उत्साही:काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविषयी चर्चा रंगू लागली आहे. व ही शिक्षा पंधरा दिवसापूर्वीच सुनावली गेली असल्याने त्यावर जास्तच चर्चा रंगली आहे. याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माझ्या विरुद्ध बॅनर लावलेले कार्यकर्ते अति उत्साही आहेत. मी केलेले आंदोलन हे स्वत:साठी नव्हते. ते मी अंपग बांधवांसाठी केले. मला दोन गुन्ह्यात एक एक वर्ष शिक्षा झाली आहे. पण याची माहिती घेत नसल्यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागे आहेत. माझी आमदारकी गेली तरी मी आनंद साजरा करेन. ३५३ चा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. हा कायदा आम्हीच चुकीच्या पद्धतीने आणला आहे.आपल्याकडे कायदे केले जातात मात्र त्याची अमंलबजावणी होत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.