मुंबई- देशात अन्नधान्य आणि औषधात भेसळ करणाऱ्यांचे पेव फुटले आहे. भेसळीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. मात्र, आपल्या देशात फाशी देता येत नाही. त्यामुळे त्यांना निदान जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असे परखड मत योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्न-धान्यान्यात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी - बाबा रामदेव यावेळी ते म्हणाले, बिहारमध्ये मेंदूज्वराने 180 बालकांचा मृत्यू झाला. ही अतिशय चिंतेची बाब आहे, अशा घटनांमुळे आपल्याला अतिशय दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग साधनेसोबतच सकस आहारही आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हल्ली अन्नात, फळांमध्ये आणि औषधातही भेसळ होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परदेशात भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. पण, भारतात ती तरतूद नाही, त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना निदान धाक बसावा यासाठी जन्मठेप तरी द्यावी, अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली.
दरम्यान, जागतिक योग दिनाच्या निम्मिताने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. नांदेडमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वतः सहभागी होणार असून ते योग करणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या साधनेला राजाश्रय मिळतोय ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. योग साधनेचा प्रसार होणे, अतिशय गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत योग आसनांचे विविध प्रकार करून दाखवले.