मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. त्यांना वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.
बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतले. त्यांनी सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंटचेही शिक्षण त्यांनी घेतले आहे. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजनही त्याच करत होत्या.
शीतल आमटे यांनी अभियंता आणि व्यवस्थापन तज्ज्ञ गौतम करजगी यांच्याशी लग्न केले आहे. ते वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आहेत आणि व्यवस्थापन व आनंदवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प पाहतात. त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा शार्विल आहे. ते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या गावी आहेत.
अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला. त्यांनी मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले होते. तसेच अपंगांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी ‘निजबल’ उपक्रम हाती घेतला होता. याचबरोबर आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं, हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.
पुरस्काराने सन्मानीत -
वयाच्या चाळीशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. तसेच त्यांना इतरही पुरस्कारही मिळाले आहेत.