मुंबई - लॉकडाऊनमुळे त्यांच्या गावी निघालेले मजूर शेकडो किलोमीटरचा प्रवास पायीच करत आहेत. चालून चालून अनेकांच्या पायातील चप्पला झिजल्या आहेत. अनेकजण रणरणत्या उन्हात चटके सहन करत पायी चालत आहेत. त्यांची अडचण ओळखत सुषमा मौर्य यांनी 'आवाज' या बिगर शासकीय संस्थेच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती मार्गावर चालत जाणाऱ्या 700 मजुरांना चपला वाटप केल्या.
'आवाज'तर्फे पायी गावी निघालेल्या 700 मजुरांना चप्पल वाटप, रोज हजार लोकांना जेवण
लॉक डाऊनमुळे त्यांच्या गावी निघालेले मजूर शेकडो किलोमीटरचा प्रवास पायीच करत आहेत. चालून चालून अनेकांच्या पायातील चप्पला झिजल्या आहेत. तर, काही जणांकडे चपलाच नाहीत. यातील शक्य त्या लोकांना 'आवाज' संस्थेच्या माध्यमातून चपला वाटप केले जात आहे. तसेच, रोज एक हजार लोकांना जेवणही दिले जात आहे. नागरिकांकडे देण्यायोग्य चपला असतील तर, त्यांनी त्या संस्थेकडे आणून द्याव्यात, असे आवाहन सुषमा मौर्य यांनी केले आहे.
परराज्यात राहणाऱ्या कामगारांसाठी प्रशासनाने त्यांच्या राज्यात जाण्यासाठी एसटी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था केली आहे. मात्र, जाणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असल्याने आपला नंबर कधी येईल, या चिंतेने अजूनही मजूर चालतच गावी निघाले आहेत. पायी प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चपलाही झिजत आहेत. त्यांना पुढील प्रवासाला त्रास होऊ नये, यासाठी 'आवाज' ही सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. मजुरांवर अनवाणी फिरण्याची वेळ येऊ नये, यासाठी आज या संस्थेच्या माध्यमातून 700 मजुरांना चपला वाटण्यात आल्या.