मुंबई:राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. मुंबईत झालेल्या पावसाने काही भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत 275 मि.मी. पाऊस एका दिवसात झाला. मात्र मुंबई महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई करून पाणी तुंबणार नाही, यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही. वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुक केले.