मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे मागाठाणे येथील विभाग प्रमुख विजय राजणेंना ( Department Head Vijay Rajne ) आमदार प्रकाश सुर्वे ( MLA Prakash Surve ) यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेनेकडून या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सातत्याने वादग्रस्त विधान करणारे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
ऑडिओ क्लिप व्हायरल :राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाच्या आमदारांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. शिंदे गटाचे मागठाणे मतदार संघातील प्रकाश सुर्वे त्यापैकी एक. सुर्वेंनी काही दिवसांपूर्वी हातपाय तोडण्याचे विधान केले होते. या वादग्रस्त विधानाचे मुंबईत पडसाद उमटले होते. आता प्रकाश सुर्वेंनी ठाकरे गटाचे मागठाण्यातील विभाग प्रमुख विजय राजणे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी या संदर्भातील ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. प्रकाश सुर्वेंनी विजय राजणे यांच्यासह राजू भाई यांना जीवे मारण्यासाठी पैसे दिल्याचे या ऑडीओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. विभागात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.