मुंबई BJP Power In Three States : चार राज्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करता आली. यापैकी काही राज्यांमध्ये काँग्रेस जोरदार टक्कर देईल अशी अपेक्षा असताना भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळं मोदी हेच गॅरंटी आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता अधिक वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला या चार राज्यांसह अन्य राज्यांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळतील अशी आशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. मोदी यांचा करिष्मा अद्यापही कायम असून मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच भारतीय जनता पक्षाला मतं मिळत आहेत. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितलं.
जागा वाटप बाबत यथावकाश निर्णय घेऊ: भारतीय जनता पक्षाची निश्चितच ताकद आणि मनोबल वाढलेलं आहे. महाराष्ट्रातही आम्ही 45 पेक्षा अधिक जागा जिंकू याचा आम्हाला विश्वास आहे. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोतच. मात्र विधानसभेत 225 जागा जिंकण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यातही भारतीय जनता पक्ष म्हणून बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत अजून कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. आता जरी आमची ताकद वाढली असं म्हटलं जातं असलं तरी आमच्या पक्षाची ताकद ही यापूर्वी सुद्धा होती. त्यामुळं आगामी निवडणुकांच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाला त्याचा योग्य न्याय दिला जाईल, असंही सावे यांनी सांगितलं. मात्र त्याबाबत यथावकाश निर्णय घेतला जाईल.
शिवसेना शिंदे गटाचा मोदींवर विश्वास : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत आमची राज्यात असलेली ताकद ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. कालच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली अशी चर्चा जरी असली तरी, त्यात तथ्य नाही. कारण युतीमध्ये समाविष्ट होतानाच युतीमधील सर्व घटकांना योग्य न्याय देण्याबाबत चर्चा झाली आहे. या दृष्टीने विचार करता महाराष्ट्रामध्ये आमचे सध्या 14 खासदार आहेत आणि 40 आमदार आहेत. त्या प्रमाणामध्ये आम्हाला निश्चितच जागा मिळतील यात दुमत नाही. त्यामुळं आमच्या वाट्याला कमी जागा येतील असं चित्र सध्या तरी नाही. ज्यावेळेस याबाबत चर्चा होईल त्यावेळेस आम्ही आपली भूमिका अधिक प्रकर्षाने मांडू.