महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवसेनाला हिरवा रंग गोड वाटतोय, औवेसीला लाजवेल इतका सेक्युलरपणा शिवसेनेत'

भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्यावतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यावरून भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. औवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे, अशी टीका त्यांनी केली.

अतुल भातखळकर
अतुल भातखळकर

By

Published : Nov 30, 2020, 5:00 PM IST

मुंबई - भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्यावतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. अजानला विरोध करणं चुकीचं आहे. हे ऐकायला गोड असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले. त्यावरून भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांची शिवसेनेवर टीका

मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. औवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाही, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली.

लहान मुलांसाठी अजान स्पर्धेनंतर रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचे आयोजनही करा. यापुढे दसरा मेळाव्यानंतर नारा ए तकबीर, अल्ला हू अकबरच्या घोषणा ऐकू येणार बहुतेक, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

अजानमध्ये प्रचंड गोडवा -

मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details